सामावून घेणारा मायेचा पदर!!
सामावून घेणारा मायेचा पदर!!
सामावून घेणारा नेहमीच असतो
तत्पर पदर आईचा,
जवळ घेऊन, डोळे पुसून,
त्यात स्पर्श असतो मायेचा....
उन्हात खेळून घामा -घूम मी,
पदरानं आई घाम टिपते,
"दमलीस बाबी" म्हणून माझे
आवडते लिंबू सरबत तयार ठेवते....
आईचा पदर माझ्या डोक्यावर
घेऊन मी कधी नवरी होते,
खेळ पाहुनी माझे असे
ती मनातल्या मनात हसते.....
हाच पदर असतो कधी आजीचा,
उब असते त्या मऊ सुताला ,
सुगंध असतो प्रीतीचा.....
आत्या काकू मामी मावशी,
या पदराला अशीही नावे,
आई नसताना यांनाच कधी
आई समजावे....
वयात आले,आता मलाच पदर आला,
'पदर सांभाळ ग' याचा मला अर्थ कळला ......
लग्न झालं अन आता झाले मीच आई,
या मायेची, प्रेमाची मला गंमत कळली बाई....
मॉडर्न मी ममा - साडी नाही नेसत,
पण सामावून घेणं, चूक पदरात घेणं,
प्रेमाने जवळ घेणं, अशा असंख्य 'पदरात' दडलेल्या भावना नाही विसरत....
पिल्लांना माझ्या जरी पदराखाली नाही घेता येत,
तरी आधार वाटावा असे घेते मी त्यांना कवेत!
जुई.
Khoop chaan...what a great way to express mom and daughter relationship ...well done Jui
ReplyDeleteThnku Shaan dada😊
DeleteAwesome.....beautiful !!!
ReplyDeleteWow..!! Wonderfully expressed..❤️
ReplyDelete